ख्रिसमस/Christmas
ख्रिसमस हा जगातील सर्वात मोठा सण आहे. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, येथे सर्व धर्मांचे लोक एकत्र राहतात. ख्रिस्ती धर्म हा विविध संस्कृतीप्रधान देशाचा एक विशाल भाग आहे कारण हा भारतातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. बरेच कॅथलिक आणि नॉन-कॅथलिक लोक हा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करतात.
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. हा सण हजारो लोक त्यांच्या पद्धतीने साजरा करतात. ख्रिसमसच्या झाडाला सजवणे ख्रिसमस स्नॅक्स बनविणे या ख्रिसमसच्या पवित्र आठवड्यात लोक पाळत असलेल्या काही परंपरा आहेत. भारतातही सर्वजण दरवर्षी २५ डिसेंबरला सांताक्लॉजच्या आगमनाची वाट पाहतात आणि कारण असे मानले जाते की सांताक्लॉज येताना भेटवस्तू घेऊन येतो. हा उत्सव देशाच्या दक्षिण आणि ईशान्य भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
ख्रिश्चन धर्म थॉमस प्रेषित यांच्यासमवेत भारतात आला आणि त्याने ५२ AD मध्ये सध्याच्या केरळमध्ये असलेल्या मलबार किनाऱ्यावरील लोकांमध्ये धर्म परिचय दिला. तेथून भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला आणि बहुतेक ख्रिश्चन लोक केरळ, तामिळनाडू, गोवा, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांत वास्तव्य करीत आहेत. सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात आल्यानंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार वाढला आणि त्यानंतर इंग्रजांनी भारतावर आक्रमण केल्यामुळे हा धर्म अधिकाधिक पसरला. धर्माच्या प्रसाराबरोबरच ख्रिसमसच्या उत्सवाचा प्रसार ही वाढला.आणि भारतीयांनी त्याला आपल्या पद्धतीने स्वीकारले आणि साजरा करण्यास सुरुवात केली.
भारताच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळ राज्यात, बरेच लोक डिसेंबरच्या सुरूवातीपासून ख्रिसमसच्या दिवसापर्यंत उपवास करतात. ख्रिसमसच्या दिवशी मुख्य म्हणजे घरी झाड आणले जाते व त्याला छान सजवले जाते. फुलं, रिबीन, लायटिंग, इत्यादी वापरून सुंदर सजवले जाते. या दिवशी खूप पदार्थ जसे भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी पदार्थ आवर्जून केले जातात खास करून केक(प्लम केक,रम केक) बनवला जातो. व सगळे मिळून ते सर्व पदार्थ खातात.
आणखी एक परंपरा म्हणजे कुटुंब आणि मित्रांना भेटवस्तू देणे. मुले विशेषत: सांताक्लॉजची वाट पहात असतात तर बरेच पालक त्यांच्या मुलांसाठी सांताक्लॉज च्या वेशात येतात आणि त्यांना भेटवस्तू देतात व आनंदाने हा सण साजरा करतात.
नाताळ सणाशी संबंधित गीते आणि संगीत हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. ख्रिसमसच्या दिवशी गायिल्या जाणाऱ्या गाण्यांना ख्रिसमस कॅरोल(Christmas Carol) ही म्हटले जाते. इसवी सनाच्या चौथ्या शतकात या संगीताचा उगम रोममध्ये झाला असे मानले जाते. १३ व्या शतकाच्या आसपास स्थानिक भाषेमध्ये नाताळची गाणी म्हणण्याची पद्धती विकसित झाली. इंग्रजी भाषेत नाताळची गाणी प्रथम इ.स. १४२६ मध्ये गायली गेली. ‘लहान मुलांमध्ये मंजुळ घंटानाद करीत सांता येत आहे’ (Jingle Bells Jingle bells… Santaclaus is coming along…) हे गीत विशेष लोकप्रिय आहे. नाताळ हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ (White Christmas) उत्साहाने साजरा होतो. लहान मुले आवर्जून बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात. त्यांना Snowman म्हटले जाते.
अशाप्रकारे हा सण केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे आणि उत्साहाने साजरा केला जातो.
0 Comments