दसरा सण /Dasra Festival
भारताची संस्कृती, येथील सण, सोहळे, भाषा, परंपरा याची चर्चा संपूर्ण जगात आहे. अनेक देशांमधल्या लोकांना भारतीय विविधतेचा फार हेवा वाटतो. भारतात अनेक सण उत्साहात साजरे केले जातात. त्यातलाच एक सण म्हणजे दसरा. हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा‘, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
“दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा” असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे.
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे असे मानले जाते. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैर्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश कीर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवाईची हा दिवस. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय योध्याचा वध करून शत्रुवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी! देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युध्द करून संपविले ते याच दिवशी! आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपुत आणि मराठा योध्दे आपल्या युध्द मोहिमांचा याच दिवशी शुभारंभ करीत असत.आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपटयाचे पानं दिली जातात. या दिवशी सिमोल्लंघन, सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन देखील केले जाते.
विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपटयाची पाने का देतात?
विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपटयाची पाने का देतात यामागे एक कथा सांगीतली जाते ती अशी…
पुर्वी ज्यावेळी गुरूशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतु नावाचे गुरू आपल्या शिष्यांना आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत. कौत्स नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या प्राप्त करण्याकरीता राहात होता. ज्यावेळी विद्याभ्यास पुर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरूजींना गुरूदक्षिणेबद्दल विचारले त्यावेळी वरतंतु ऋषी म्हणाले ’’वत्सा विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरीता असते त्याचा मोलभाव करायचा नसतो त्यामुळे मला गुरूदक्षिणा नको ’’. परंतु कौत्स ऐकेचना त्यामुळे गुरूजी म्हणाले ’’मी तुला चौदा विद्यांचे ज्ञान दिले म्हणुन तू मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास ’’. पण कौत्साकडे एवढे मुद्रा नव्हते म्हणून तो रघुराजाकडे गेला आणि त्याने त्यांच्याकडून चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. इंद्रदेवाने त्वरीत रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेरा द्वारे आपटयाच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवीला. रघुराजाने कौत्सास हव्या तेवढया सुवर्ण मुद्रा घेउन जाण्यास विनंती केली परंतु कौत्साने केवळ चैदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि वरतंतु ऋषींना ती घेण्याची विनंती केली. उर्वरीत सुवर्ण मुद्रांचे कौत्साने आपटयाच्या आणि शमीच्या झाडाखाली ढिग रचले आणि सामान्य नगरवासीयांना हव्या तेवढया मुद्रा घेउन जाण्याची विनंती केली. तो दिवस विजयादशमीचा होता. अचानक श्रीमंत होण्याची संधी चालुन आल्याने नगरवासीयांनी आपटयाच्या आणि शमीच्या झाडाची पुजा केली आणि तेव्हांपासुन सुवर्णमुद्रांऐवजी आपटयाच्या पानांची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली. ते सोने आपट्याच्या झाडावर पडले म्हणूनच आपट्याच्या झाडाला व त्याच्या पानाला सोन्याचे प्रतीक मानून ते एकमेकांना देण्यात येते.
भारताच्या विविध प्रांतात दसरा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो जसे की :
महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. शेतकरी आपल्या शेताला पूजतात. घरोघरी दसऱ्याचा दिवशी पूजा केली जाते. वह्या-पुस्तक, औजारे जसे कात्री, सूरी, आणि झाडूसुद्धा पुजली जाते. घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
दक्षिण भारतात म्हणजेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि दरवर्षी केली जाणारी मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.
पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी रावणदहन केले जाते. हे बघण्यासाठी अनेक जण एकत्र येतात. व रावणाचा म्हणजेच वाईटाचा नाश झाला यासाठी लोक परस्परांना मिठाई भेट देतात.
गुजरातमधील सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा सण साजरा केला जातो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व खूप दिले जाते.
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.लोक खूप उत्सवाने हा सण साजरा करतात.
आपटयाचे झाड
आपटयाच्या झाडाला अश्मंतक आणि वनराज देखील म्हटले जाते. कफ व पित्त दोषांवर ही पानं गुणकारी आहेत असे समजले जात. विजयादशमीला आपट्याची पाने परस्परांना दिली जातात. याला सोने लुटणे असेही म्हणतात.
‘साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ असे वाक्य संत तुकाराम महाराजांनी कितीतरी पुर्वीच या सणाचे महत्व आपल्या काव्यातुन अधोरेखीत केले आहे.
0 Comments