महाबलीपूरम/MAHABALIPURAM
महाबलीपुरमच्या द्रविड शैलीतील जगप्रसिद्ध हिंदू मंदिरांना युनेस्कोने इ.स.१९८४ साली जागतिक वारसा स्थळ (UNESCO world heritage site) म्हणून घोषित केले आहे.
महाबलीपुरम हे प्राचीन मंदिर चेन्नईपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे. सागरी किनाऱ्यावर असलेलं हे प्राचीन मंदिर त्याकाळातील इंजिनियरिंगचा व कला कौशल्याचा उत्तम नमूना आहे. हे महाबलीपूरमचे समुद्र काठावरील मंदिर आठव्या शतकातील दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते.
मध्यभागी भगवान विष्णूचे मंदिर असून दोन्ही बाजूला शिवमंदिर आहेत. येथे असणारे मंदिर आणि स्थळांचे अवशेष त्याकाळातील भव्यतेचं दर्शन घडवतात. महाबलीपुरम हे भव्य मंदिरे, स्थापत्य व सुंदर सागरतटासाठी जगभरात प्रसिद्ध अ्रसलेले शहर आहे. बंगाल खाडीच्या तटावर वसलेले हे शहर पूर्वी मामल्लापुरम नावाने ओळखले जात असे. सातव्या शतकातील हे शहर पल्लव राजांच्या राजधानीचे शहर होते. महाबलीपुरममध्ये ग्रेनाइटच्या दगडांना पैलू पाडून भव्य आणि जीवंत प्रतिमा तयार केल्या जात असत. आजही त्या ठिकाणी त्यावेळच्या काही प्रतिमा पाहायला मिळतात. हे ठिकाण भारतीय इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण येथे प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहता येतात.
ममलापुरमच्या नावाचा उगम ‘मामल्लन’ या शब्दापासून झाला आहे. ‘मामल्लन’ शब्दाचा अर्थ ‘महान कुस्तीगीर’ असा होतो. मामल्लन ही नरसिंहवर्मन-२ ला दिलेली उपाधी होती.
इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळामध्ये पुरूष वर्गामध्ये आपली शारीरिक शक्ती राखण्याचा प्रभाव होता. त्यामुळे त्याकाळातील लोक मल्ल युद्ध किंवा कुस्ती यांसारख्या शारीरिक बल दाखवणाऱ्या खेळांना प्राधान्य देत असत. आणि हे फक्त सैनिकच नाही तर राज्यात असलेल्या सामान्य लोकांमध्ये ही अशा स्पर्धा खेळवली जात असत. अशाच स्पर्धांमध्ये विजयी झाल्यानंतर आपला विजय साजरा करण्यासाठी आणि त्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी त्याकाळातील राजे मंदिर आणि गुहा तयार करत असत. त्यामुळेच महाबलीपुरममध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि कलात्मक गुहा पाहायला मिळतात.
वैशिष्ट्य व ओळख
अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे, म्हणजे एकाच दगडाला ला कोरून हे मंदिर बनवण्यात आले आहे. इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे. या गुफेत गोवर्धन धारी श्रीकृष्ण व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत. या गुफेजवळ पंच पांडव रथ आहेत. मुख्य रथाला धर्मराज रथ म्हटले जाते. कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे.या मंदिरासमोरच वराहमंडप आहे.त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहेत असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.
येथील लोकप्रिय रथ मंदिराच्या दक्षिणेला स्थित आहे. याच भागात महाभारतातील पाच पांडवांच्या नावाचे पाच दगडी रथ आहेत म्हणूनच महाभारतातील पाच पांडवांच्या नावाने त्याला पांडव रथ म्हणतात. पाच रथांपैकी चार रथ अखंड शिळेतून कोरले गेले आहेत. द्रौपदी व अजुर्नाचा रथ चौकोनी आकाराचा आहे. यात धर्मराजाचा रथ सर्वात उंच आहे. महाबलीपूरममधील प्रवेशाकडील भागातील दगडचा भव्य शिला फोडून कृष्ण मंडप उभारला गेला आहे. या मंडपाच्या प्रवेशद्वारावर तेथील ग्रामीण जीवनावर आधारित कथा कोरलेल्या आहेत.
थिरुकदलमलई हे भगवान विष्णूला समर्पित मंदिर महासागरातील शिल्पांच्या संरक्षणासाठी पल्लव राज्यांनी बांधले होते.
वराह लेणी मंदिर (Varaha Cave Temple) हे ७ व्या शतकातील एक लहान रॉक-कट मंदिर आहे. वराह लेणी विष्णूच्या वराह आणि वामन अवतारासाठी प्रसिद्ध आहे. वराह लेणी पल्लवच्या चार चिंतनशील द्वारपालांसाठी देखील प्रसिध्द आहे. तसेच सातव्या शतकातील महिषासुर मर्दिनी लेणी कोरीव कामांसाठी लोकप्रिय आहे.
0 Comments