भारत एक असा देश आहे जिथे सर्व धर्माचे जातींचे लोक एकत्र राहतात. व त्यांचे सण ही एकत्र साजरा करतात. असाच एक सण म्हणजे ओणम. केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. हा चिंगम म्हणजेच आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र च्या दिवशी साजरा केला जातो. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस म्हणजेच तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. श्रवणालाच तिरूवोणम असे म्हणतात. ओणम हा शब्द ‘श्रावणम्’ या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ २७ नक्षत्रांपैकी एक असा आहे.
असे म्हटले जाते की महाबली हा दैत्यांचा बलाढ्य राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गातील देवांनाही परागंदा व्हावे लागले. तो दैत्य असूनही विष्णुचा भक्त होता. म्हणून स्वर्गातून हद्दपार झालेल्या देवांनी कश्यप ऋषींची पत्नी अदितीकडे महाबलीची तक्रार केली. मग अदितीने विष्णुला त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले, विष्णूने ते मान्य केले. याच सुमारास महाबलीने एका मोठ्या मेजवानीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक अतिथीची मनोकामना पूर्ण केली जाईल असे त्याने जाहीर केले होते. या मेजवानीला विष्णूने ब्राह्मण बटूच्या वामनाच्या रूपात तेथे हजेरी लावली आणि महाबलीकडे तीन पावले जमिनीची मागणी केली. महाबलीने वामनाची विनंती मान्य केली. त्यानुसार वामनाने आपल्या दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग पादाक्रांत केला. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी वामनाने महाबलीकडे जागा मागितली. त्यावर महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास वामनाला सांगितले. वामनाने लगेच तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले.
महाबलीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वर मागण्यास सांगितले. त्यानुसार महाबलीने वर्षातून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याचा वर वामनाला मागितला. तेव्हापासून महाबली राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो असे मानले जाते. आपल्या प्राणाची चिंता ना करता महाबली राजाने आपले वाचन पूर्ण केले. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला, म्हणून घरोघरी त्याची पूजा होऊ लागली, त्याला देवत्व प्राप्त झाले. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.
ओणम सण हा १० दिवसांचा असतो. अथम, चिथिरा, चोडी, विशाकम, अनिझम, थ्रीकेता, मूलम, पुरदाम, उथ्राडोम आणि तिरुवोनम या नावांनी हे दिवस ओळखले जातात.
उत्सवात लोक पारंपारिक नृत्य, खेळ आणि संगीत देखील सादर करतात ज्यांना ओनाकलिकल म्हटले जाते. लोक फुलांचे कार्पेट(एकप्रकारची रांगोळी) बनवतात ज्याला ‘पुक्कलम‘ म्हणून ओळखले जाते आणि राजा महाबलीच्या स्वागतासाठी त्यांच्या घरासमोर ते ठेवतात. लोक नवे कपडे घालतात, पाककृती केळीच्या पानांवर वाढतात. अनेक पारंपारिक विधी जसे सांप बोट रेस, ओनप्पट्टन, काझचालकुला, पुली काली, कैकोटीकक्कली इत्यादी ‘साध्य’ नावाच्या भव्य मेजवानीद्वारे केले जातात.
या सणात भरपूर कार्यक्रम साजरे केले जातात जसे:
लोक नृत्य: यात महिला लोकनृत्य सादर करतात जे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. नाचताना ते राजा महाबलीची स्तुती करतात. ते सगळे मिळून एकत्र गोल आकार बनवून नाचतात आणि याला थुंबी थुलाई असे ही म्हटले जाते.
वल्लमकाली बोट रेस: बोट चालविण्याच्या स्पर्धेत जवळपास 100 बोटमेन एकमेकांशी स्पर्धा करतात. तेथील लोकांमध्ये हे खूप प्रसिद्ध आहे. विविध नौकांचे सुंदर सजावट केले जाते. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक लोक बघायला जमा होतात.
पुक्कलमः फुलांच्या मदतीने अनेक रंगीबेरंगी डिझाईन्स(एकप्रकारची रांगोळी) लोक त्यांच्या घरासमोर बनवतात यालाच पुक्कलम म्हणतात. काही जागेवर तर याची स्पर्धा सुद्धा होते. रोज त्या पुक्कलम वर नवीन फुलांची परत चढवली जाते असे सलग १० दिवस केले जाते.
हत्ती मिरवणूक: या दिवशी हत्तींना फुले, दागदागिने आणि धातूंनी सजवले जाते. मग त्यांना घेऊन मिरवणूक काढली जाते.
असे अजून अनेक कार्यक्रम साजरे केले जातात.
0 Comments