Header Ads Widget

रक्षाबंधन/Rakshabandhan - राखी बांधताना भावाच्या कपाळाला टिळा का लावला जातो?/ या सणाला नारळी पौर्णिमा असे ही म्हटले जाते.

रक्षाबंधन/Rakshabandhan

Image Source - Google | Image by - Wikimedia Commons

रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हे शब्द किती मोठे वाटतात, पण त्यामागची भावना तितकीच सोपी व स्पष्ट आहे. शाळेत आठवीत असताना एकदा बाईने आम्हा सगळ्या विद्यांथ्यांना राखी बनवण्याचे सामान घेऊन यायला सांगितले. आणि त्या तासाला ती राखी बाईंसमोर बनवायची. मला बहीण नव्हती म्हणून रक्षाबंधन माझ्यासाठी एवढं काही खास नव्हतं. पण त्यादिवशी एक नवलच घडलं. अचानक एक मुलगी आली आणि म्हणाली कि मला माहित आहे की तुला कोणी बहीण नाही म्हणून मी आजपासून तुला राखी बंधू का? एका क्षणासाठी काहीच कळलं नाही आणि मी म्हणालो हो चालेल बांध. तिने साध्या वुलच्या धाग्याची तिने रंगीबिरंगी राखी बनवलेली. ती बांधताना तिच्याही चेहऱ्यावर आनंद होता आणि माझ्याही. शाळेत होतो म्हणून काही औक्षण वगैरे करता आलं नसलं तरी ती भावना महतवाची होती. राखी बांधल्यावर भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं असतं हे माहित होतं पण हे अचानक असं होईल हे माहित नव्हतं आणि मी काहीच घेऊन नव्हतो गेलो. माझ्याकडे रोजचे मिळणारे दोन रुपये होते ते मी तिला दिले. त्यावर ती म्हणाली मी राखी पैसे मिळावे म्हणून नाही बांधली आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसली. मला ती गोष्ट एवढी मनाला लागली. मी घरी गेलो आई-बाबांना सांगितलं. आईने एक पर्स घेतली ती रंगीत कागदात बांधली आणि तिला द्यायला सांगितली. दुसऱ्या दिवशी मी तिला जबरदस्ती ती भेटवस्तू दिली. त्यानंतर दरवर्षी ती मला राखी बांधू लागली. नशिबाची गोष्ट म्हणजे आज एवढ्या वर्षांनंतरही ती माझी बहीण मला न विसरता जवळ असली की घरी राखी बांधायला येते आणि जर लांब असेल तर पोस्टाने राखी पाठवते. त्या दिवसाने माझा रक्षाबंधनाचा असलेला विचारच बदलून टाकला. आणि त्या दिवसामुळेच मला एक बहीण मिळाली.

रक्षाबंधन या शब्दातच या सणाचा अर्थ दडला आहे. म्हणजेच असे बंधन जे रक्षा करण्यासाठी बांधले जाते. हा सण बहीण आणि भाऊ यांमधील स्नेह आणि ओढ ही भावना प्रदान करतो. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा(रक्षाबंधन) ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात.याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वाचन देतो आणि बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी कामना करते. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.


या सणाचे हेतू व महत्त्व

पूर्वी जेव्हा मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी जायची आणि जेव्हा सणवार असत तेव्हा ती माहेरी यायची. तिला नेहमी असा वाटत असे कि आपल्या मागे असा कोणीतरी खंबीर व्यक्ती पाहिजे तो तिच्यासाठी कधीही धावून येईल. अशी व्यक्ती जी तिच्या मनात एकदम जवळची असेल आणि जेव्हा तिला सगळ्यात जास्त गरज असेल किंवा जेव्हा ती काही अडचणीत असेल तर ती व्यक्ती कायम तिचे रक्षण करेल. एका मुलींसाठी तिच्या हक्काची ती एक व्यक्ती म्हणजेच भाऊ. ती त्याच्यात कृष्णाचे रूप बघत. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला जात-धर्म-पंथाला छेद देत इतिहासही साक्षी आहे. हे संदर्भ लक्षात घेऊन “राखी’ बांधली तर बांधून घेणारा आजन्म कृष्णासारखा होतो.

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा उपलब्ध नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्र विजयी व्हावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्या दोराच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. अखेर इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरु झाली.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.

राखी बांधताना भावाच्या कपाळाला टिळा का लावला जातो?

एक स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते कारण हा टिळा फक्त मस्तकाच्या आदरासाठी नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठी लावला जातो. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. असा त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.

सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. राखी म्हणजे छान असा रेशमी धागा आपल्या भावाला बांधणे असे नव्हे. शिवाय त्याच्या मागची भावना महत्वाची आहे. तस बघायला गेलो तर आजही काही गरीब बहिणी आपल्या भावाला सध्या कपड्याचा तुकडा त्याचा मनगटावर बांधून रक्षाबंधन साजरी करतात. यात काहीच वाईट नाही कारण त्याच्या मागची भावना ही महत्त्वाची असते. ही राखी बहिणीने बनवलेली असो किंवा आणलेली असो किंवा जर बहिण लांब राहत असेल तर इंटरनेट च्या माध्यमातून पाठवलेली असो त्यातून जी भावना निर्माण होते ती फार मोलाची असते.

रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. या दिवशी बहीण भावाच्या घरी जाते व राखी बांधते. ती जाताना भावासाठी गोडधोड बनवून घेऊन जाते. राखी बांधताना ती भावाला ओवाळते आणि त्याला गोड भरवते आणि मग त्याच्याकडून तिचे रक्षण करण्याचे वचन घेते. भाऊ आपल्या बहिणीला नेहमी रक्षा करण्याचे वाचन देतो व तिला भेट वस्तू ही देतो.

या सणाला नारळी पौर्णिमा असे ही म्हटले जाते, ते नेमके काय असते ते जाणून घेऊ:

‘नारली पुनवेचे सणाला… जाऊ दर्याचे पूजेला…’ असे गीत गाऊन या सणाला साजरा केला जातो.

पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. समुद्रात खूप मोठ्या लाटा येत असतात. होड्या, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्र देवतांची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला कुणी सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो किंवा कुणी साधा नारळ अर्पण करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. कोळी बांधव नारळ पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. या दिवशी घरी गोडधोड जेवण बनवले जाते. खास करून नारळी भात बनवला जातो. नारळी पौर्णिमेन‌िमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा(पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवला जातो. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात.

असा हा सण खूप आनंदात साजरा केला जातो.

भारताच्या अनेक भागात हा सण कोणत्या नावाने ओळखला जातो हे पाहूया:


  • श्रावण पूर्णिमा – भारताच्या ईशान्य भागात
  • रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा – गुजरात, महाराष्ट्र, गोवा यासह पश्चिम किनारपट्टी प्रदेश
  • पावित्रोपाणा – गुजरात
  • झुलन पूर्णिमा – पश्चिम बंगाल आणि ओडिशासह पूर्व भाग
  • अवनी अवित्तम – भारताचे दक्षिणी भाग
  • कजरी पूर्णिमा – मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश यासह मध्य प्रदेश

Post a Comment

0 Comments