Header Ads Widget

लोणार सरोवर/ Lonar Lake एक असे तलाव ज्याला जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते...

लोणार सरोवर/ Lonar Lake एक असे तलाव ज्याला जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते...

Image Source - Google | Image by - Wikimedia Commons

निसर्गाने आपल्याला आजपर्यंत खूप आश्चर्यकारक, अद्भुत, रहस्यमय,अद्वितीय गोष्टींशी ओळख करून दिली आहे. प्रत्येकाचे आपले काही स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. हे निसर्गनिर्मित गोष्टी आपल्याला संपूर्ण जगात बघावयास मिळतील. अशीच एक अद्भुत निर्मिती म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. अनेकांना या सरोवराबद्दल माहिती असेल पण याची निर्मिती कशी झाली याची माहिती खूप कमी लोकांना असेल. ते कळल्यावर तुम्हालाही निसर्गाची किमया लक्षात येईल.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर उल्कापाताने निर्माण झालेले बेसाल्ट खडकाचे आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. त्यावेळी झालेल्या उल्कापाताने पृथ्वीच्या वेगेगळ्या भागात असे चार विवरं तयार झाली. त्यात भारतातील ओडिसा, उत्तर अमेरिकेतील ऍरिझोना आणि ऑस्ट्रेलियातील बॉक्सविल हे समाविष्ट आहेत. भारतीय सरकारने या सरोवराला राष्ट्रीय भू-वारसा म्हणून या स्थळाला दर्जा दिला आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ,इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारगपूर (इंडिया )यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

शिवाय महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

अंतराळातून लोणार सरोवर असे दिसते.
या सरोवरात असलेले पाणी मूळात क्षारयुक्त, खारे असले तरी सरोवरात क्षारयुक्त पाणी आणि गोड पाणी असे दोन प्रवाह आहेत. हीच या सरोवराची वैशिष्ट्ये आहे. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या कोनाने आली आणि आदळली असे मानले जाते. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. 

पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. तरीही जर आपण भूतकाळात बघितलं तर याचा अनेक बाबींतून परिचय मिळतो. जसे की: आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा 'बैरजतीर्थ' असा केला जात असे. पौराणिक आक्ख्यायिकेनुसार भगवान श्री विष्णूंनी लावणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या राक्षसाच्या नावावरून या सरोवराचे नाव आले आहे असे म्हटले जाते.

लोणार सरोवरातील पाणी अचानक गुलाबी-लाल रंगाचे का झाले? 

१५ जून च्या आसपास एका रात्रीत लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी-लाल रंगाचे झाले. स्थानिक लोकच नव्हे तर जगभरात हा चर्चेचा विषय ठरला. अचानक झालेल्या या बदलामुळे सगळीकडे खळबळ माजली. पण नेमके कारण काय यावर तज्ज्ञांनी आपले मत मांडले. बदलत्या वातावरणामुळे, कमी झालेले पावसाचे प्रमाण आणि कोरडेपणामुळे, गेल्या काही वर्षांपासून सरोवराच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. लोणार सरोवराचं पाणी गुलाबी व्हायचं शास्त्रीय कारण म्हणजे लोणार सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने, सूर्यप्रकाशाने आणि अपुऱ्या पावसाळी पाण्याने बिटा कॅरोटीन रंगद्रव्य तयार होऊन पाणी गुलाबी रंगाचे झाले आहे असे मानले जात आहे. प्रा.डॉ.सुरेश मापारी यांनी काही जल तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरोवरात हॅलोबॅक्टरीया आणि ड्युनोलीना सालीना नावाच्या काकवांची(fungus ) खऱ्या पाण्यात जास्त वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉइड नावाचा रंगहीन पदार्थ लीक होते त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा असे ते म्हणाले.

आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी लोणार चे पाणी कधीही या रंगाचे झाले नव्हते. तर नेमकं आताच का असा रंग बदलला हा तज्ञांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे व याचे उत्तर अजून ही शोधले जात आहे.



Post a Comment

0 Comments