नवरात्री सण / Navaratri Festival
![]() | ||
|
हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता.
पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या शारदाची नांदी लावत अश्विन मास जवळ येतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला संपुर्ण भारतभर सुरूवात होते. प्रारंभी पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे नियमित केले जाते. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी विडयाच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे. पुजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. गणपतीची देवीची आणि नवरात्राची आरती म्हंटल्या जाते. सकाळ संध्याकाळ आरती आणि धुप पेटवला जातो. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात.तसेच कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. एकुणच संपुर्ण नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचे उपासक देवी चा गोंधळही ठेवतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.
नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसांमधे दुर्गेची पुजा केली जाते जिला उर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातं. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा केली जाते. पहिले तिन दिवस त्यांच्या कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पुजन करण्यात येतं. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून “महिषासुरमर्दिनी” असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. ओम नम्छचंडीकाये हा जाप करतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत. अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.
जोगवा
नवरात्रीमध्ये जोगवा म्हणून, बायका जोगवाही मागतात. जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.
ललिता पंचमी
हे काम्य व्रत असून स्त्री व पुरुष दोघेही हा व्रत करू शकतात. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात.
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात.
गुजरातमध्ये नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. गरबा किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य विशेष करून नवरात्रात केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.नृत्याची सुरूवात मंद संगीताने केली जाते, जसजसे नृत्य पुढे जाते तसतसे नृत्य करणाऱ्यांचा उत्साह वाढत जातो. संगीताला देखील मधे मधे बदलण्यात येतं आणि गरबागीतं वाजवले जातात. नवरात्री गरबा भारतात नृत्याचा सर्वाधीक प्रसिध्द आणि लोकप्रीय प्रकार आहे, या नृत्याला महिला आणि पुरूष दोघेही सोबत करू शकतात. बरेचजणं पारंपारीक गुजराती पोषाख घालुन गरबानृत्य करतात.
0 Comments